…म्हणून बिल गेट्स यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- केंद्र सरकारच्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या यशस्वीतेमुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. केवळ 100 दिवसांत 6 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. हे पाहून आनंद झाल्याचे गेट्स यांनी म्हटलं आहे. याबद्दल बिल गेट्स यांनी ट्विटरवरुन पीएमओ आणि भारत सरकारचे अभिनंदन केले आहे.

आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 2 जानेवारी रोजी ट्विट करून, पहिल्या 100 दिवसांत आयुष्यमान भारत योजनेतून 6 लाख 85 हजार नागरिकांना लाभ मिळाल्याचं सांगितलं होतं. तसचे नागरिकांकडून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे हे वाचून बिल गेट्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन भारत सरकारचे कौतुक केले.  बिल गेट्स यांनी आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे ते ट्विट रिट्विट करून भारत सरकारला शुभेच्छा देत अभिनंदन केलं. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या पहिल्या 100 दिवसांच्या यशस्वीतेबद्दल भारत सरकारचे अभिनंदन.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत बुधवारपर्यंत देशातील 8.50 लाख नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशी माहिती समोर आली आहे. ही योजना मोदी सरकारने  25 सप्टेंबर रोजी दिन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 2018 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार  गरीब कुटुंबातील व्यक्तींना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे.