भाजप नेत्याचे मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे पत्र; ‘आता सगळं आपुलकीने जाणून घेण्याची गरज’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन  –   प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची चिंता आहे. तरी दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी. दोन वर्षात दंडाच्या पावत्यांमधून जमा केलेल्या रकमेतून ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी सुरू करावी, असे विनंती करणारे पत्र भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

राज्यात ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यावरून भाजपकडून सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. मात्र, भाजपचे पदाधिकारी गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. कोरोना तपासणी व दंडात्मक कारवाईबद्दल राज्यात सुरू असलेला कोरोना महामारीचा संसर्ग या सर्वांमुळे सामान्य जनता घाबरली आहे. व्यापारी तथा लघू उद्योजक, घरातील रूग्णांमुळे बाहेर पडणारा सामान्य नागरिक हा मागील वर्षभर कमी जास्त प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पूर्णपणे आर्थिक अडचणीत आला आहे.

तपासणीसाठी वणवण…

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्याने व्यापारी, शेतमाल विक्रेते यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. निर्णय चांगला आहे. मात्र, लाखो लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एक तपासणी केंद्र आहे. त्यामुळे तेथे चाचणी करता लोक जमल्यास गर्दी होत आहे. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या अनेकांना तपासणी न करताच परतावे लागत आहे.

आता सगळं आपुलकीने जाणून घेण्याची गरज

काही कारणास्तव विनामास्क बाहेर पडणाऱ्यांना रस्त्यावर मोफत मास्क देण्याची सोय करावी. दम्याचा त्रास असणारा मास्कमध्ये गुदमरतोय. तरी तो घराबाहेर का पडतोय? हे सगळं आपुलकीने जाणून घेण्याची गरज आहे. त्याची कारणे नक्कीच डोळे पाणावणारी आहे, असेही पत्रात म्हटले आहे.