‘काटेरी’ झुडपात सोडून दिलेल्या ‘शिवकन्या’चे धनंजय मुंडे, सप्रिया सुळे यांनी स्वीकारले ‘पालकत्व’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परळीतील रेल्वे रुळाच्या जवळील झुडुपात फेकून दिलेल्या नवजात अर्भकाचं पालकत्व स्वीकारलं आहे. या नवजात अर्भकाला नकोशी म्हणून तिच्या आई वडिलांनी फेकून दिले होते. या मुलीचं नाव त्यांनी ‘शिवकन्या’ असे ठेवले असून तिचा संपूर्ण खर्च हे दोन्ही नेते करणार आहेत.

हे अर्भक परळीतील बरकत नगर परिसरात सोमवारी सायंकाळी रेल्वे रुळाजवळील झुडपात आढळून आले. रस्त्यावरील नागरिकांना रडण्याच्या आवाजामुळे हे नवजात अर्भक सापडले होते. यानंतर लगेचच अर्भकाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा आढळून आले की काही तासांपूर्वीच या बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेमुळे परळीत खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेची माहिती धनंजय मुंडे यांना मिळताच त्यांनी स्वत: पोलीस आणि डॉक्टरांशी संपर्क साधला आणि या अर्भकाचं पालकत्व स्वीकारलं. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या अर्भकाचं पालकत्व घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांमध्येच या अर्भकाला पालकांचे छत्र मिळाले.

दरम्यान बीड जिल्हा राष्ट्रवादीने धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांनी या शिवकन्येचं पालकत्व घेतल्याचं आपल्या ट्विटरवरुन जाहीर केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, मुलीवरील उपचाराचा खर्च, तिचं शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे करणार आहेत. सध्या ही मुलगी सुखरूप असून मुंडे यांनी तिचं नाव शिवकन्या असं ठेवलं आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांनी समाजात नवा आदर्श घालून दिला आहे असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.