PubG च्या नादात ‘पठ्ठया’ हिमाचलमधून थेट महाराष्ट्रात पोहचला, पोलिसांनी ‘असं’ शोधलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल तरुणाईला ऑनलाईन गेमिंगचे फॅड लागले आहे. हाच फॅड एका तरुणाला चांगलाच भारी पडला आहे. पबजीचा टास्क पूर्ण करण्यासाठी एक अल्पवयीन हिमाचल प्रदेशहून महाराष्ट्रात पोहोचला. अल्पवयीन मुलाला महाराष्ट्रातून ट्रेस करण्यात आले आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि मुलाचे पालक रवाना झाले आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलनमधील कुनिहार भागातील एक अल्पवयीन १७ फेब्रुवारी रोजी अचानक घरातून गायब झाला. कुटुंबीयांनी कुनिहार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी शोध घेतला असता किशोरच्या मोबाईलचे लोकेशन महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सापडले. यानंतर पोलिस चाईल्ड युनिटने किशोरला थांबवून त्याला सुरक्षित ठेवले. आता पोलिसांच्या पथकासह त्याचे कुटुंबीय त्याला घेण्यासाठी रवाना झाले आहे. माहितीनुसार, पबजी गेम खेळत असताना टास्क पूर्ण करण्याचा नादात घरातून बाहेर पडला. त्याला हेदेखील कळले नाही कि तो आपल्या घरापासून कितीतरी किलोमीटर दूर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे पोहोचला आहे.

दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शिवकुमार शर्मा यांनी सोलन येथील घटनेची माहिती देताना सांगितले की, १७ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती. किशोर महाराष्ट्रातील मनमाड येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तिथल्या पोलिसांशी संपर्क साधून किशोरला पकडण्यात आहे. ते म्हणाले की, पालक व पोलिस अल्पवयीन मुलाला पकडण्यासाठी महाराष्ट्रात पोहोचले आहेत.

You might also like