सांगली : वडिलांचा खून, मुलाला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – वडिलांनी काम सांगितल्याचा रागातून लाकडी दांडक्याने खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. रावसाहेब ऊर्फ दीपक बाबू चौगुले असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी ही शिक्षा सुनावली.
२६ जानेवारी २०१६ रोजी हि घटना नांद्रे येथे घडली होती. मृत बापू चौगुले पत्नी, मुलगा सून आणि नातवंडासोबत चौगुले गल्ली येथे राहत होते. रावसाहेब अतिशय रागीट स्वभावाचा आहे. छोट्या छोट्या कारणावरून तो वडिलांच्या अंगावर धावून जात होता. त्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार देखील सुरु होते.

२५ जानेवारी २०१६ रोजी वडिलांनी त्याला मी शेतामध्ये कामानिमित्त जाणार असल्याने घरातील पाणी भर असे सांगितले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यातून रावसाहेबने वडिलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे वडील हे पहाटे बंबमध्ये अंघोळीसाठी पाणी तापवत असताना रावसाहेबने लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यात तीन ते चार वेळा हल्ला केला. त्यामुळे ते खाली कोसळले.

त्यांचा आवाज ऐकून पत्नी घराबाहेर आल्या त्यावेळी पतीच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत असल्याने खाली कोसळलेले दिसले तर मुलगा पळून जाताना दिसताच त्यांनी आरडाओरडा केला. शेजारील लोकांनी त्याना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमोल पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली होती.

फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी तपास करून आरोपीच्या विरोधात भक्कम साक्षी पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सादर साक्षीपुराव्या आधारे न्यायालयाने रावसाहेबला दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.