राज्यपालांवर कागदाच्या बोळ्यांचा मारा ; गदारोळात एक आमदार बेशुद्ध

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ करत राज्यपालांवर कागदाचे बोळे फेकण्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेश विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.

राज्यपाल राम नाईक यांचे आज अभिभाषण होते. राज्यपाल राम नाईक यांचे अभिभाषण सुरु असतानाच विरोधकांनी सभागृहात तुफान गोंधळ घालण्यास सुरुवात केली. राज्यपालांचे अभिभाषण संपल्यानंतर सपा आणि बसपचे सगळे आमदार वेलमध्ये उतरले आणि बॅनर हातात घेत घोषणाबाजी करायला लागले. वेलमध्ये काय सुरू आहे हे पाहण्यासाठी राज्यपाल राम नाईक उभे होते. यावेळी त्यांच्यावर बोळे फेकण्यात आले. हा गोंधळ सुरू असताना सपाचे सुभाष पासी नावाचे आमदार बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची निंदा केली आहे.

घटनेची पुनरावृत्ती –
उत्तरप्रदेश विधानसभेत राज्यपालांवर कागदाचे बोळे टाकण्याचा प्रकार यापूर्वीही घडला होता . राज्यातील समाजवादी पक्षाच्या सत्तांतरानंतर विधानसभेच्या पहिल्या सत्रात विरोधकांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत राज्यपाल राम नाईक यांचे अभिभाषण सुरु असतानाच कागदाचे बोळे फेकून मारले होते. विरोधकांच्या या गोंधळातच राज्यपालांनी आपले अभिभाषण पूर्ण केले होते. यावेळी सभागृहात वर्तमान मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव देखील उपस्थित होती. हा गदारोळ सुरु असताना अखिलेश मात्र मिश्किलपणे हसताना दिसत होते. राज्यपाल राम नाईक यांनी ‘संपूर्ण उत्तर प्रदेश हे पाहत असून हे योग्य नाही’ असेही म्हटले होते.