100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूमधून वाचलेल्या आजींनी घेतली कोरोनाची लस

रिओ दी जेनिरिओ : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाने मागील वर्षापासून धुमाकूळ घातलाय. पण, आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महामारी म्हणून स्पॅनिश फ्लूचा उल्लेख केला जातोय. 100 वर्षांपूर्वी 1918 -20 या काळात स्पॅनिश फ्लूने जगभरातत हाहाकार माजवला होता. स्पॅनिश फ्लूने ब्राझीलसह जगात सुमारे 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. या साथीत कोणतीही लस नसताना एक आजी वाचली होती. त्यावेळी 5 ते 6 वर्षे वय असलेल्या आजींनी आता कोरोनाची प्रतिबंधक लस टोचून घेतलीय.

झीलिया दी कार्व्हेलो मोर्ले असे या आजीचं नाव असून त्या आता 106 वर्षाच्या आहेत. बुधवारी झीलिया आजींनी कोरोनाची लस टोचून घेतलीय. तेव्हा त्यांनी स्पॅनिश फ्लूची आठवण सांगितल्या.

झीलिया यांचा जन्म 1914 मध्ये रिओ दी जेनेरिओ इथे झाला होता. 1918 ते 1920 या काळात स्पॅनिश फ्लू जगात पसरला होता. त्यावेळी फ्लूपासून वाचवणारी कोणतीच लस उपलब्ध नव्हती. त्याबद्दल सांगताना झीलिया आजी म्हणतात की, संपूर्ण ब्राझील फ्लूच्या विळख्यात सापडला होता. कित्येक लोकांचा मृत्यू झालाय, ते ते विसरू शकत नाही.

ब्राझीललाही कोरोनाचा फटका
ब्राजीलसह जगाभरातील अनेक देशांत सर्वात आधी 100 वर्षांच्या आसपास वय असलेल्या व्यक्तींना लस दिली जातेय. ब्राझीलमध्ये मंगळवारी लसीकरण मोहिमेला सुरुवात झालीय. याठिकाणी चीनच्या सिनोवेकने तयार केलेली लस टोचलीय. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 10 हजार जणांचा मृत्यू झालाय. जगात सर्वाधिक कोरोनाचा फटका बसलेल्या देशांत ब्राझील तिसर्‍या क्रमांकावर आहे. झीलिया यांचे डॉक्टर पॉलो सेसर यांनी सांगितलं की, झीलिया यांच्या आई-वडिलांनाहि फ्लू झाला होता.

स्पॅनिश फ्लूवेळी नव्हतं योग्य औषध
झीलिया 6 ते 7 वर्षांच्या होत्या. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की,’लोक रस्त्यावर मरून पडत आहेत. त्यावेळी कोणत्याही प्रकारची औषधे उपलब्ध नव्हती. किती लोक मरत होते त्याचं मोजमाप नव्हतं.’ झीलिया जिथं राहतात तिथंही कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झालाय. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अद्याप वृद्धांच्या प्रकृतीची चिंता डॉक्टरांना वाटत आहे.

झीलियाचे डॉक्टर म्हणतात की, आता आम्हाला थोडीशी शांती मिळेल. लस आल्यामुळे वृद्धांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होणार आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक सहकार्‍यांना गमावलंय.