मुलांना चष्मा लागणे हे अनुवंशिकतेसह आहार व जीवनशैलीशी निगडित !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आई-वडिलांची दृष्टी कमजोर असल्यास त्यांच्या मुलांचीही दृष्टी कमजोर असू शकते किंवा होऊ शकते. पालकांना चष्मा असल्यास मुलांनाही तो लागणारच. परंतु तज्ज्ञांच्या माहितीनुसार याचा संबंध मोठ्या प्रमाणावर आहार, जीवनशैली आणि अन्य सवयींशी निगडित आहे. तैवानमध्ये ८४% शालेय मुलांना चष्म्याची गरज भासते. तथापि, भारतात अशी केवळ ५% मुले आहेत.

अनेकदा असेही घडते की, आई-वडिलांची दृष्टी ठीक असते, परंतु मुलांना चष्मा लागतो. ग्रामीण भागातील (२.८%) मुलांच्या तुलनेत शहरातील (६.९%) मुलांची दृष्टी कमजोर असल्याचे आढळले आहे. व्हिडिओ गेम, मोबाइल, सततचे वाचन आणि बऱ्याच प्रमाणात शहरी जीवनशैली त्यास अधिक जबाबदार ठरते. जर आई-वडील नियमितपणे मुलांच्या डोळ्यांची तपासणी करीत असतील तर दृष्टिदोषाच्या समस्येपासून त्यांचा बचाव होऊ शकतो. पालकांची दृष्टी क्षीण असण्याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या मुलांचीही दृष्टी क्षीण होऊ शकेल. मात्र ग्लुकोमा किंवा मायोपिया (दूरच्या अंतरावरील पाहण्यासाठी चष्मा लागणे) आनुवंशिक असू शकते. २०० पेक्षाही अधिक अशा जीन्सची ओळख पटली आहे, जे मायोपियाचे कारक आहेत. आई-वडिलांपैकी कुणा एकाची दृष्टी क्षीण असेल तर मुलांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता अधिक असते.