‘या’ दबंग महिला अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी क्रीडा संघटना ‘आक्रमक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – हुकुमशाही कार्यपद्धतीचा आरोप करून जिल्ह्यातील क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षकांनी दबंग जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची बदली करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकीय नेत्यांनीही या अधिकाऱ्याच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. नेमका त्यांच्यातील वादाचे कारण काय आहे, याचा स्पष्ट उलगडा होऊ शकलेला नाही. त्यातच नावंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन नियमाप्रमाणे काम करते म्हणून क्रीडा संघटनांनी मला टार्गेट केले आहे, असा आरोप केला आहे. त्यामुळे १७ ऑगस्ट रोजी क्रीडा संघटनांच्या रास्ता रोको आंदोलनाच्या इशारामुळे प्रशासन नमती भूमिका घेऊन त्यांची बदली करणार की क्रीडामंत्री विनोद तावडे या नावंदे यांच्या बाजूने उभे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या नावंदे यापूर्वी मंत्रालयात मंत्री तावडे यांच्या ‘ओएसडी’ होत्या. नगरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला. नियमाप्रमाणे काम सुरू केल्यानंतर अनेक क्रीडा संघटना व राजकीय नेतेमंडळी दुखावली गेली. संघटनांनी नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या नावंदे यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केले. त्यांचे शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले. आता त्यांच्या बदलीचा इशाराही दिला आहे. यासाठी १७ ऑगस्ट रोजी रास्तारोको करण्यात येणार आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे हेही नावंदे यांच्या विरोधात आहेत.

नियमाप्रमाणे काम करणाऱ्या नावंदे या जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळींना अवघड वाटू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी प्रशासनावर दबाव येऊ लागला आहे. राज्याचा क्रीडा विभाग नावंदे यांची बदली करणार की नियमाप्रमाणे काम करून क्रीडा क्षेत्रातील मातब्बर मंडळींच्या चुकीच्या कामांना वेसण घालणाऱ्या दबंग अधिकारी कविता नावंदे यांच्या बाजूने क्रीडामंत्री तावडे उभे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या बदलीवरून जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –