पुण्यातील SRPF गट १ ला ‘वनश्री’ पुरस्कार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वानवडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक १ने वृक्षारोपणात केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या महसुल आणि वन विभागाच्या वतीने राज्यस्तरीय छत्रपपी शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वृक्ष संवर्धनाच्या कार्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यामध्ये राज्यस्तर आणि विभागस्तर असे दोन्हीमध्ये एसआयपीएफच्या गट क्रमांक १ ने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्ह व प्रशिस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी हे २०१७ मध्ये राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १ चे तत्कालीन समादेशक म्हणून कार्यरत असताना त्यांनी त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सुमारे ४ हजार वृक्षांची लागवड केली होती. त्यातील सुमारे ९२ टक्के रोपे जगवली आहेत. यासाठी त्यांनी गटातील कर्मचाऱ्यांसोबतच विविध सामाजिक संस्थांची मदत घेतली होती. वृक्षांची योग्य पद्धतीने जोपासना व्हावी, यासाठी त्यांनी येथील जमिनीचा मृदा संवर्धनाच्या प्रकल्पापासून ते रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेत तळी यासारखे प्रकल्प हाती घेतले होते.

वडाची वाडी हे गाव दत्तक घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचा भाग म्हणून त्याच कालावधीत त्यांनी दोन्ही ठिकाणची पक्षी गणना करुन घेतली त्यामध्ये २६ प्रकारच्या पक्षांच्या विविध जातींमधील तब्बल १ हजार १५० पक्षी परिसरात आढळून आले होते. या विविध प्रकारच्या कामगिरीमुळे राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक १ला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त-