एसटीच्या संपाला गालबोट, कामाच्या ज्यादा ताणामुळे एस.टी चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन

डबल ड्यूटी करुन घरी परतत असताना एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. भास्कर अवचार असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.कामाच्या जादा ताणामुळे त्यांचा मृत्यू झालाल्याचे म्हटलं जात आहे. या प्रकारामुळे आगारात एकच खळबळ उडाली असून वाहक आणि चालक संतप्त झाले आहेत. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. तसेच आगाराची बस सेवाही बंद करण्यात आली आहे.

गुरुवारी मध्यरात्रीपासून विविध मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही संघटनेच्या पाठिंब्या शिवाय हा संप सुरू आहे. अद्याप देखील संपावरती तोडगा निघालेला नाही त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठ्याप्रमाणात हाल होत आहे. एसटी प्रशासनाकडून काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे. यामध्ये काही कर्मचारी सहभागी आहेत, तर काही जण कामावर आहेत.

हिंगोली आगाराचं नियोजन मागील काही दिवसापासून कोलमडलं असल्याचा आरोप आहे. चालक आणि वाहकांच्या ड्युटीच्या वेळाही अनेकदा बदलल्या जात आहेत. त्यामुळे चालक आणि वाहकांना मोठ्याप्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान या घटनेनंतर एसटी कामगार संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.भास्कर अवचार यांना बळजबरीने ड्यूटी लावल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आल्याचा आरोप आगारातील कामगारांनी अधिकाऱ्यांवर केला आहे.

ड्यूटी संपवून आल्यानंतर देखील भास्कर अवचार यांना परत ड्यूटीवर जाण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. मात्र आपली प्रकृती बरी नसल्याचे अवचर यांनी सांगितले. त्यानंतर देखील अागाराच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं एेकून घेतलं नाही. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येऊन अवचर यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांनी हा प्रकार इतर सहकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर आगारप्रमुख बाळासाहेब झरीकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. ड्युटी बुकिंग अधिकारी वाबळे यांनी देखील अवचार यांना पुढील तीन दिवस सुट्टी पाहिजे असल्यामुळे त्यांनीच ही डबल ड्यूटी मागून घेतल्याचं सांगितलं आहे.