स्टॅलिन भावूक : वडिलांना (करुणानिधी) लिहलं  पत्र 

चेन्नई: वृत्तसंस्था

”जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडायचा, मला सांगून जायचा. काल मात्र काहीही न सांगता निघून गेला. थलैवा… तुम्ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. माझ्या मनात, श्वासांत, रक्तात, विचारांमध्ये… माझ्या रंध्रारंध्रात तुम्हीच होता… मला एकटं सोडून, हूरहूर लावून गेलात. तुम्ही कुठे निघून गेलात?”

हे शब्द आहेत तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत करुणानिधी यांचे पुत्र व राजकीय वारसदार स्टॅलिन यांचे. त्यांनी आपल्या भावना पत्रात लिहून मनातील भावनिक कल्लोळाला वाट मोकळी करून दिली आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d98825cd-9afa-11e8-9e61-1de677456ebc’]

आपल्या पत्रात स्टॅलिन  पुढे म्हणतात… ”३३ वर्षांपूर्वीच तुम्ही स्वत: तुमच्या स्मरणार्थ (स्मारकावर कोरण्यासाठी) ओळी लिहिल्या होत्या, ‘ज्यानं एक क्षणाचाही विसावा न घेता अविरत परिश्रम केले, तो इथं (कबरीत) चिरविश्रांती घेतो आहे.”आयुष्याभर थलैवा (नेता) म्हणत आलो… तामिळांचा उद्धारकर्ता, एक नेता म्हणूनच तुमच्याकडं पाहिलं… बाबा म्हणून कधीच हाक मारली नाही… थलैवा, आज फक्त एकदाच मी तुम्हाला ‘बाबा’ म्हणू का?’  अश्या प्रकारचे पत्र लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांचे काल निधन झाले. चेन्नई येथील कावेरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांच्या  पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पहाटे चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये आणण्यात आले  आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.  द्रमुकचे राज्यभरातील कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं चेन्नईत जमले आहेत.