‘पोलीस कार्यालयात 50 % हजेरी; इतरांना Work From Home’, पोलीस महासंचालकांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस कार्यालय 50 टक्के हजेरीवर सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी याबाबत आदेश जारी केले आहेत.

कोणाची किती उपस्थिती ?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयीन उपस्थिती विषयी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गट अ आणि ब श्रेणीतील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या 100 टक्के राहिल असं नमूद करण्यात आलं आहे.

क आणि ड श्रेणीसाठी 50 टक्के उपस्थिती
गट क आणि ड श्रेणीतील पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या 50 टक्के राहिल. यापैकी 25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते 4 या कालावधीत कार्यलयात उपस्थित राहतील. उर्वरीत 25 टक्के कर्मचारी सकाळी 11 ते 5 या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील. कोणत्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहायचं आहे याबाबतचा निर्णय संबंधित उपसहायक घेतील.

वर्क फ्रॉम होम
गट क आणि ड श्रेणीतील उर्वरीत पोलीस कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करतील. तात्काळ सेवेसाठी फोनवर उपलब्ध नसतील. ज्यावेळी कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयात तातडीची आवश्यकता असेल त्यावेळी तात्काळीन परिस्थितीनुसार संबंधित उपसहाय्यक जास्त कर्मचाऱ्यांना (गट क आणि ड श्रेणी) कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी बोलवू शकतात.

हेमंत नगराळेंनी दिला सतर्कतेचा इशारा
राज्यातील कोरोनाची वाढती आकेडवारी पाहता आता राज्यातील पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनीही कोरोनाविरोधातील लढाईची घोषणा केली आहे. वर्षभर कोरोना सोबत लढलो. आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा युद्ध करण्याचे दिवस आले आहेत असं म्हणत त्यांनी पोलीस यंत्रणेला सतर्क केलं आहे.