झारखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, बाबुलाल मरांडी भाजपमध्ये दाखल !

रांची : वृत्तसंस्था – बाबुलाल मरांडी भाजपमध्ये दाखल झाले असल्याची चर्चा झारखंडच्या राजकीय वर्तुळात केली जात आहेत. शुक्रवारी त्यांनी नवी दिल्ली येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर भाजपचे सदस्यत्व घेतल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी झारखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच झाविमोचे प्रमुख बाबुलाल मरांडी रांची येथून रवाना झाले. केवळ भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांनी झारखंड सोडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, खरमासानंतर याची औपचारिक घोषणा बाबुलाल करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बाबुलाल मरांडी हे भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले जातील आणि झारखंडमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असतील, अशादेखील चर्चा केल्या जात आहेत. परंतु, ते कुठे गेले आहेत, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बाबुलाल रांचीच्या बाहेर गेले असून ते दिल्ली किंवा कोलकाता येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेले असल्याची चर्चा आहे.

बाबूलाल भाजपमध्ये सामील होण्याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप राज्यात एक मजबूत आदिवासी नेता शोधत आहे, तर बाबुलाल यांच्या पक्षाला निवडणुकीत काही खास कामगिरी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत हे दोघेही एकमेकांबाबतच्या शक्यता शोधत आहेत. बाबुलाल भाजपामध्ये सामील झाले तर पक्ष त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देऊ शकेल. भाजपने हे पद आतापर्यंत रिक्त ठेवले आहे.

दरम्यान, खरमास नंतरच भाजपमधील विधानसभेच्या नेत्याची निवड केली जाईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. बाबुलाल मरांडी यांनीही झाविमोची कार्यकारी समिती भंग केली आहे आणि खरमासनंतर पुढचे पाऊल उचलण्याची चर्चा केली आहे. येथे विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरणाऱ्या भाजपाला संघटनेच्या पातळीवर अस्वस्थता जाणवत आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार आता बाबुलाल मरांडी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतरच रणनीती ठरविली जाईल. मात्र, खरमासच्या बहाण्याने पक्षाचे नेते हे टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. अंतर्गत संघटनेतही मोठ्या बदलांची चिन्हे आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/