CBSE : 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंबंधी गृह मंत्रालयाच्या ‘मार्गदर्शक’ सूचना जाहीर, कन्टेनमेंट झोनमध्ये कोणतेही परीक्षा केंद्र असणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसई 10 वी आणि 12 वीच्या उर्वरित परीक्षा घेण्यासंदर्भात गृह मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व शाळांना परीक्षेच्या वेळी या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक अंतर लक्षात घेऊन परीक्षा केंद्रात परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रात थर्मल स्क्रीनिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था देखील महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही कन्टेनमेंट झोनमध्ये परीक्षा केंद्र असणार नाही. परीक्षा केंद्रांमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांना फेस मास्क परिधान करणे बंधनकारक असेल. या व्यतिरिक्त मंत्रालयाकडून असेही म्हटले गेले आहे की विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर नेण्यासाठी विशेष बसेस देखील चालविल्या जाऊ शकतात.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले की दहावी व बारावीच्या उर्वरित बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले आहे की, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सामाजिक अंतर, फेस मास्क सारख्या अटींसह दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा घेण्यासंदर्भात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

सोमवारी सीबीएसईने उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले
1 जुलै ते 15 जुलै दरम्यान या परीक्षा घेण्यात येणार आहेत. वेळापत्रक प्रसिद्ध करण्यासोबतच सीबीएसईने असेही म्हटले आहे की कुटुंबीयांनी त्यांचा मुलगा किंवा मुलगी आजारी आहे का हे सुनिश्चित करावे. तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे लागेल. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी मास्क घालून आपल्या सोबत सॅनिटायझर देखील परीक्षा केंद्रात आणणे महत्वाचे असेल.

परीक्षेला बसण्यासाठी सीबीएसईने बनविले हे नियम –

1. सर्व विद्यार्थ्यांना एक पारदर्शक बाटली मध्ये स्वत:चे हँड सॅनिटायझर घेऊन जाणे आवश्यक असेल.
2. सर्व विद्यार्थ्यांनी मास्क किंवा कपड्याने आपले नाक आणि तोंड झाकले पाहिजे.
3. सर्व विद्यार्थ्यांनी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
4. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी हे पालकांना आपल्या मुलांना सांगावे लागेल.
5. पालकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांचे मूल आजारी पडणार नाही.
6. परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी सर्व सूचना काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत.
7. प्रवेश पत्रात लिहिलेल्या सर्व सूचना विद्यार्थ्यांनी पाळल्या पाहिजेत.
8. परीक्षेचा कालावधी वेळापत्रक व प्रवेश पत्रात लिहिलेला असेल.
9. उत्तरपत्रिका सकाळी 10.00 ते 10.15 या वेळेत वितरीत केल्या जातील.
10. सकाळी 10.15 वाजता प्रश्नपत्रिका वाटप करण्यात येतील.
11. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ असेल. 10.15 ते 10.30 हा वेळ विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी असेल.
12. विद्यार्थी 10.30 पासून प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरवात करतील.