लष्करे तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्यावर ED कडून आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लष्करे तय्यबाचा म्होरक्या, फलेह इन्सानियत फाउंडेशनचा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद, आणि त्याचा सहकारी शाहिद मेहमुद, भारतीय नागरिक मोहंमद सलमान, दुबईतील पाकिस्तानी नागरिक मोहंमद कामरान आणि दिल्लीतील हवाला सूत्रधार मोहंमद सलीम ऊर्फ मामा याच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने आज आरोपपत्र दाखल केले आहे.

दहशतवादी संघटना निधीच्या संबंधावरून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे आरोपपत्र ईडीनं दाखल केलं आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार मोहंमद सलमान हा पाकिस्तानी संघटना फलाह-ए-इंसानियत फाउंडेशन (एफआईएफ)ला आणि त्यांच्या साथीदारांना निधी पुरवित होता. एफआईएफची स्थापना हाफिज सईद याने केली आहे. एफआईएफला संयुक्त राष्ट्राने २०१२ मध्ये आंतकवादी संघटना म्हणून जाहीर केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेनं यापूर्वीच सईदला आंतरराष्ट्रीय आंतकवादी म्हणून घोषीत केलं आहे.

एफआईएफला निधी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही आंतकवादी संघटना स्वतःचे नेटवर्क तयार करीत असतात. हा निधी पाकिस्तानमधून नंतर दुबई येथे पाठविला जात असल्याचं ईडीने केलेल्या चैाकशीत आढळले आहे. ईडीनं म्हटले आहे की आरोपी मोहंमद सलमानला हवालामार्फत फलेह इन्सानियत फाउंडेशनकडून पैसा मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कलमान्वये दहशतवादी संघटनांना आणि कारवायाना निधी पुरवल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. पाकिस्तान येथील फलेह इन्सानियत फाउंडेशनविरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या आधारावर ईडीने कारवाई केली आहे.