T20 कर्णधार हरमनप्रीत कौर कोविड-19 पॉझिटिव्ह; घरामध्ये स्वतःला केले ‘आयसोलेट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आल्या आहेत. हरमनप्रीत यांनी स्वतःला घरामध्ये आइसोलेट केले आहे. हरमनप्रीत कौर अलीकडे असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे इंटरनॅशनल मालिकेत सहभागी होत्या. सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युसूफ पठान, बद्रीनाथ आणि इरफान पठान हे ही कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व क्रिकेटर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजेंड्स टिमचे सदस्य होते.

१७ मार्च रोजी एकदिवशीय मालिकेचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळला गेला. एकदिवशीय आंतरराष्ट्रीय मालिकेचे सर्व सामने लखनौमध्ये खेळले गेले होते. हरमनप्रीत यांनी वनडे मालिकेत ४०, ३६, ५४ आणि नॉटआऊट ३० धावा केल्या होत्या. हरमनप्रीत कौर यांनी भारतासाठी एकूण २ टेस्ट, १०४ वनडे इंटरनॅशनल आणि ११४ T20 इंटरनॅशनल सामने खेळल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यांचे नाव क्रमाने २६ धावा आणि ९ विकेट, २५३२ धावा आणि २५ विकेट, २१८६ धावा आणि २९ विकेट नोंदवले आहे.

३२ वर्षीय हरमनप्रीत दक्षिण आफ्रिकाच्या विरोधात T20 इंटरनॅशनल मालिकेमध्ये सहभागी होऊ शकल्या नाहीत. एकदिवशीय मालिकेत शेवटच्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर T20 टीममधून बाहेर झाल्या आणि त्यांच्या जागी स्मृती मंधाना यांना कर्णधार करण्यात आले.