दीपिका पादुकोणच्या JNU भेटीबाबत भाजप मंत्री म्हणाले – ‘सिनेमाच्या प्रमोशनला कोण अडवू शकतं ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु) मध्ये झालेल्या हिंसेविरुद्ध माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात मंगळवारी रात्री अभिनेत्री दीपिका पादुकोणने हजेरी लावत सर्वांनाच चकित केलं. तिने हल्ल्यातील जखमी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष हिच्यासबोत संवादही साधला. परंतु सभेला संबोधित न करताच ती निघून गेली. यानंतर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावर भाष्य केलं आहे. कोण कुठे जातं हे कोणी थांबवू शकत नाही. हा लोकशाही असणारा देश आहे. कोणी सिनेमाच्या प्रमोशनसाठी जातं तर कोणी सिनेमाच्या प्रमोशनसाठी इव्हेंट तयार करतं.” असे त्यांनी म्हटले आहे.

दीपिका पादुकोण दिल्लीत छपाक सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी तिने जेएनयु हल्ल्याला विरोध करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिच्या जेएनयुला जाण्यावर नक्वींनी प्रतिक्रिया दिली आहे.

दीपिका याआधी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाली होती की, “जेएनयु हिंसा आणि सीएए विरोध पाहिल्यानंतर गर्व वाटतो की, आपण आपलं म्हणणं निडरपणे मांडतो आहोत. आपले विचार काहाही असो, परंतु आपण देश आणि त्याच्या भविष्याबाबत विचार करत आहोत. ही चांगली बाब आहे.”

विद्यापीठातील कार्यक्रमात जेएनयुच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी हिंसेचा विरोध केला. यावेळी सीताराम येचुरी, डी राजा, योगेंद्र यादव, शर्मिष्ठा मुखर्जी, कन्हैय्या कुमार सहित अनेक आजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष म्हणाली, “कॅम्पसमधील हिंसा विद्यार्थी खपवून घेणार नाहीत.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/