विद्यार्थी अपघात अनुदान योजनेत घोटाळा, ‘मनविसे’कडून चौकशीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विद्यार्थ्यांना अपघात झाल्यास त्या पाल्यास व त्याच्या पालकांना आर्थिक सहाय्य व्हावे, या उद्देशाने शिक्षण विभागामार्फत राजीव गांधी विद्यार्थी सानुग्राह अनुदान योजना (Rajiv Gandhi Vidyarthi Sanugrah Grant Scheme) सुरु करण्यात आली आहे. या योजनेत अनुदान वितरणात घोटाळा झाल्याची शक्यता असून अनुदान वितरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे शहाध्यक्ष कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी केली आहे.

राजीव गांधी सानुग्राह अनुदान योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत असून देखील या योजनेसाठी देण्यात आलेले एकूण अनुदान पडून राहिले असल्याने योजनेच्या वितरणात घोटाळा झाला असल्याची शक्यता असल्याने मनसेने याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जातात. मात्र या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु ही जबाबदारी पार पाडण्यात सरकार सक्षम नसल्याचे दिसून येते.

कल्पेश यादव म्हणाले, राजीव गांधी सानुग्राह अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना अनुदान वाटप करुन देखील 1 कोटी 11 लाख 5 हजार रुपये अनुदान शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. इयत्ता 1ली ते 12 वी शिक्षण घेणारे विद्यार्थी हे या योजनेचे लाभार्थी आहेत. या अंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास पालकांना 75 हजार रुपये अनुदान दिले जाते. अपघातांमध्ये कायमचे अपंगत्व आल्यास 50 हजार अनुदान देण्याची तरतूद आहे. तसेच अवयव किंवा डोळा निकामी झाल्यास तीस हजार रुपये अनुदान दिले जाते.

यादव पुढे म्हणाले, 2019-20 या शैक्षणिक वर्षात एकूण 635 विद्यार्थ्यांना अनुदान प्राप्त होणे अपेक्षित होते. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला 4 कोटी 67 लाख 29 हजार रुपये अनुदान स्वरुपात वितरीत करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात 3 कोटी 56 लाख 16 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात आले. त्यामुळे 1 कोटी 11 लाख 5 हजार रुपये अनुदान प्रत्यक्ष लाभार्थ्या पर्यंत पोहचले नसल्याचे स्पष्ट होते. राज्य सरकारने राजीव गांधी सानुग्राह अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाची तातडीन चौकशी करावी, चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे.