लाच स्वीकारताना दुय्यम निबंधकासह सहाजण गजाआड

पन्हाळा : पोलीसनामा आॅनलाईन
पन्हाळा येथे शेतीच्या कामासाठी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणामध्ये दुय्यम निबंधक यशवंत चव्हाण, शिपाई प्रकाश सणगर, डाटा ऑपरेटर नितीन काटकर, लिपिक गौरी बोटे, सुशांत वणिरे व शहाजी पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयांत प्रचंड खळबळ उडाली आहे.या धडक कारवाईमुळे काही दिवसापासून चर्चेत असणार्‍या निबंधक कार्यालयात चाललेला गोरखधंदा समोर आला आहे.

बांदिवडे (ता. पन्हाळा) या ठिकाणी वास्तव्यास असणारे अभिमन्यू पाटील यांनी कणेरी येथील तानाजी रामू जानकर यांची गट क्रमांक 534 मधील चार गुंठे शेत जमीन खरेदी करण्यासाठी साधरण किती रुपयांचा खर्च येईल अशी चाैकशी करण्यासाठी पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील निबंधक यशवंत चव्हाण यांना मंगळवारी पाटील भेटण्यास गेले होते. यावेळी अधिकारी चव्हाण याने कागदपत्र करण्यासाठी अडचण येत असल्याचे सांगून 1500 रुपयांची मागणी केली. तसेच इतर ही कर्मचाऱ्यांना काय हवे आहे याची विचारणा करा असे सांगितले. त्यानुसार अभिमन्यू पाटील हे सर्वांना भेटले. तेंव्हा सर्वांनी मिळून पाच हजार रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोड केल्यानंतर साडे तीन हजार रुपयांवर व्यवहार ठरला.

यानंतर पाटील यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये रितसर तक्रार दाखल केली. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने पोलिस निरीक्षक प्रविण पाटील व त्यांच्या सहकार्याच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला असता यावेळी दुय्मम निबंधक यशवंत सदाशिव चव्हाण (रा.हरिओमनगर, कोल्हापूर) यास दीड हजार रुपये, तर लिपिक सौ. गीता पांडुरंग बोटे, (रा.राजोपाध्येनगर, कोल्हापूर), शिपाई प्रकाश यशवंत सणगर (रा. नवे पारगाव), डाटा ऑपरेटर नितीन कोंडिबा काटकर (रा. ड्रायव्हर कॉलनी कोल्हापूर), सुशांत दत्तात्रय वणिरे (रा. कोल्हापूर) व खासगी उमेदवार शहाजी बळवंत पाटील (रा. उत्रे) या पाच जणांनी तक्रारदार अभिमन्यू पाटील (रा. बांदिवडे, ता. पन्हाळा) यांच्याकडून ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले.