मंत्रालयाच्या दारात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आज (शुक्रवारी) दुपारी एका महिलेने मंत्रालयाच्या दारातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान तिथे तातडीने हजर झाल्यामुळे त्यांनी वेळीच या महिलेचे प्राण वाचवले. शारदा अरूण कांबळे (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला चेंबूर येथे राहणारी असून तिने मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. ज्याची परतफेड न करता आल्याने तिने मंत्रालयाच्या दारात स्वतःवर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले SRPF चे जवान, हवालदार डी. के. माने, पोलीस शिपाई के. डी. राऊत यांनी वेळीच महिलेच्या हातून रॉकेलची बाटली काढून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.