बारावीत नापास झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

बारावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला. बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्याने ३० मे रोजी राहत्या घरात दीडच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याचा आज (बुधवार) सकाळी उपचरादरम्यान मृत्यू झाला. ओंकार विजय काळे (वय-१९ रा. मोती चौक, बापट मळा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओंकार याचेवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

आकाश काळे हा सांगलीतील बापट मळ्यातील मोती चौकात आई, वडील, आजी, भावासमवेत राहत होता. त्याच्या वडलांचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. आकाशने चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची बारावीची परीक्षा दिली होती. ३० मे रोजी बारावीचा निकाल जाहिर झाला. निकाल पाहण्यासाठी आकाश बाराच्या सुमारास नेट कॅफेत गेला होता. निकाल पाहून दुपारी दीडच्या सुमारास घरी परत आला. त्याने आईला चार विषयात नापास झालो असल्याची माहिती फोन करुन दिली होती. घटनेच्यावेळी घरामध्ये आजी आणि त्याची मावशी या दोघीच घरी होत्या.

निकाल पाहून घरी आल्यानंतर आकाश कोणाला काहीही न बोलता दुस-या मजल्यावर गेला. दरम्यान परगावी गेलेली त्याची आई घरी आली. तिने ओंकार कुठे आहे अशी विचारणा आजीकडे केली. त्यावेळी आजीने ओंकार वरच्या मजल्यावर गेला असल्याचे सांगितले. आईने धावत जाऊन वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडला असता ओंकार याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला वर उचलून त्याच्या गळ्यातील गळफास सोडवून त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नापासच्या भीतीने एकाची आत्महत्या

दरम्यान निकालाच्या दिवशीच बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने कर्नाळ (ता. मिरज) येथील प्रणव दुष्यंत माने (वय 18) याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती.