प्रेम प्रकरणातून भावा-बहिणीची विष पिऊन आत्महत्या

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन-तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे चुलत भावा बहिणीने प्रेमसंबंधातून विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रेमीयुगलाच्या आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. ही घटना सोमवारी (दि.२४) रात्री घडली.

गणेश बाळासाहेब पाटील (वय-३४), सारिका संभाजी पाटील (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तपासी अंमलदार प्रशांत पठाणे यांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव येथे सारिका व गणेश हे दोघे शेजारी शेजारी राहतात. एकाच भावकीतील असल्याने ते नात्याने चुलत भाऊ, बहिण लागतात. तीन महिन्यांपूर्वी हे दोघे घरातून पळून गेले होते. दीड महिन्यांपूर्वी दोघेही घरी परत आले. यावेळी त्यांनी एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगितले होते. मात्र ‘तुम्ही नात्याने भाऊ बहिण आहात, हे सर्व चुकीचे आहे’, अशी समजूत दोघांचीही काढण्यात आली होती. यानंतर गणेश कोल्हापूर येथे नोकरीसाठी गेला. तर सारिका घरीच होती.

सोमवारी रात्री ९ च्या सुमारास गणेश गावामध्ये आला. यावेळी त्याने आपण आल्याचे कोणालाच सांगितले नव्हते. याचवेळी सारिका देखील घरामधून बाहेर पडली. घरापाठीमागे असणार्‍या द्राक्षबागेमध्ये दोघेही भेटले व त्याच ठिकाणी घरच्यांचा विरोध असल्याने नैराश्यापोटी विषप्राषन करुन आत्महत्या केली. पुढील तपास हवालदार प्रशांत पठाणे करीत आहेत.