मंचरमध्ये महिला वकिलाची राहत्या घरात आत्महत्या

मंचर : पोलीनामा ऑनलाइन – मंचरमधील एका महिला वकिलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबजनक घटना घडली आहे. रुपाली वसंत थोरात (वय-32) असे आत्महत्या केलेल्या महिला वकिलाचे नाव आहे. रुपाली थोरात यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपली थोरात या मंचर शहरातील विठ्ठल ओंकार इमारतीत फ्लॅट नंबर 403 मध्ये राहात होत्या. रात्री त्या घरी एकट्याच होत्या. त्यानंतर त्यांनी घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी इमारतीचे मालक राजेश शिदोरे यांना रुपली यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली.

पोलीस आणि रुपाली यांचे कुटुंबीय घरामध्ये गेले त्यावेळी त्यांना रुपाली यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तसेच त्या ठिकाणी एका डायरीमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही. माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलीचा सांभाळ बहिणीने करावा. तसेच माझी असलेली सर्व संपत्ती मुलीला देण्यात यावी असे या सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आले आहे.

दरम्यान, पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रुपाली थोरात यांनी आत्महत्या केल्याची माहिती तानाजी रामचंद्र जाधव (रा. मंचर) यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मयत दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.