अपघातात गेला एकाचा जीव; दुसर्‍याने केली आत्महत्या, अन् पोलिस…

हिंगणा : पोलीसनामा ऑनलाइन – येथील कवडस या गावात दुचाकी अपघातात जखमी झालेल्या दूध व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. १६) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. किसना सीताराम गयाळी (५६, रा. कवडस) असे गळफास घेतलेल्या दुग्ध व्यावसायिकाचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झाले. पती व पत्नी दुग्धव्यवसाय करून कुटुंबाचा गाडा रेटत होते.

दरम्यान, मागील आठवड्याभरापूर्वी दुचाकीने जात असताना समोरासमोर दोन दुचाकीची धडक होऊन त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात समोरील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या अपघात प्रकरणाची चौकशी पोलिस करीत होते. या अपघातात किसन गयाळी जखमी झाले होते. यामुळे घरीच वास्तव्याला होते. या प्रकरणातून वाचविण्यासाठी तपासातील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी येरझाऱ्‍या सुरू केल्या. दरम्यान, जखमी गयाळी धास्तावले होते.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन पोलिस कर्मचारी १५ डिसेंबरला कवडस येथे गेले होते. या भेटीदरम्यान पोलिसांनी चिरीमिरी वसूल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पुन्हा चिरीमिरी घेण्यासाठी हे पोलिस कर्मचारी कवडस येथे १६ डिसेंबरला जाणार होते. मात्र, १६ डिसेंबरला सकाळी ७.३० वाजता त्यांनी घरीच गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती ग्रामस्थांनी हिंगणा पोलिसांना दिली. घटनेची माहिती होताच हे तीन पोलिस कर्मचारी कमालीचे धास्तावले. यामुळे या आत्महत्येबाबत पोलिसांच्या भूमिकेवरून गावात वेगवेगळी चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, येथील पोलिस कर्मचारी पंचनामा करण्यासाठीही गावात गेलेच नाही. दुसऱ्याच पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांनी पाठविले. रात्रपाळीत ड्युटीवर असलेले कर्मचारी पंचनामा करण्यासाठी गेले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सारिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.

… तर पोलिस कर्मचाऱ्यांनी असा कारभार केला नसता
हिंगणा पोलिस ठाण्याअंतर्गत धामणा बीट येते. बीट प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक अरविंद रघुवंशी यांची बदली झाली आहे. यामुळे या बीटाला प्रमुख अधिकारी नाही. कवडस गाव धामणगाव बिटात मोडते. बीटप्रमुख जर असते तर पोलिस कर्मचाऱ्यांनी असा कारभार केला नसता. यामुळे या बिटाला तातडीने अधिकारी नेमणे गरजेचे आहे. याबाबत पोलिस उपायुक्त नरूल हसन यांनी दखल घेणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी काय दखल घेतात, हे दिसून येईल.