पोलीस दलात खळबळ ! वरिष्ठाने WhatsApp करून जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – वरीष्ठांवर गंभीर आरोप करत सोलापूर शहर आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचा-याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यामुळे सोलापूर पोलीस दलात प्रंचड खळबळ उडाली आहे.

याच पोलीस ठाण्यात कार्य़रत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हॉट्सॲपवर मॅसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत मानसिक त्रास दिला दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरपासून जवळ असलेल्या एका गावाजवळ महिलेने विष प्राशन केले होते. महिलेच्या नातेवाईकाने बेशुद्धावस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मृत महिला पोलीस कर्मचारी आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी या दोघात काही चॅटिंग झाल्याने यावरून महिलेच्या घरात वाद निर्माण झाला होता. मात्र हे चॅटिंग काय होते, तिने आत्महत्या कशामुळे केली हे प्राथमिक तपासात पुढे आले नाही. या घटनेबाबत पोलिसात अद्याप कोणतीही तक्रार नोंद केलेली नाही. मात्र या घटनेचा सविस्तर तपास करुन दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे.