रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या

वृत्तसंस्था : आपण एकविसाव्या शतकात राहत असून सुद्धा आज देशात मुली सुरक्षित नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि त्यातल्या त्यात शाळकरी मुलींसोबत जर असा गंभीर प्रकार होतोय तर पोलीस प्रशासनाने सतर्क व्हायची गरज आहे. शाळेत एका अनोळखी मुलाने चिठ्ठी दिल्याचा प्रयत्न केल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या काजल पोरे या मुलीने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. मुलीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वखारी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
वखारी येथील माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात काजल पोरे ही विद्यार्थीनी दहावीत शिकत होती. दोन दिवसापूर्वी शाळेत असताना तिला एका अज्ञात मुलाने एका लहान मुलाच्या हातून चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना शाळेतील शिक्षकांनी पाहिल्यावर त्यांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली. या चिठ्ठी प्रकरणी काजलच्या पालकांना बुधवारी शाळेत बोलावून त्यांना याची कल्पना दिली होती.

शाळा सुटल्यानंतर काजलने घरी आल्यावर स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. काजल दरवाजा उघड नसल्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीने तातडीने बोलावून घेतले. दरवाजा तोडल्यानंतर काजलने गळफास घेतल्याचे दिसले. कुटुंबीयांनी काजलला ग्रामस्थांच्या मदतीने दवाखान्यात नेले. तिथे मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसापासून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढू लागल्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकाची या परिसरात करडी नजर होती.
आता काजलच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोडरोमिओंचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.