विखेंच्या पराभवासाठी थोरात सरसावले काँग्रेस कार्यकर्त्यांची रविवारी बैठक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात हे सरसावले आहेत. त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक रविवारी दुपारी नगर शहरात आयोजित केली आहे.

आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा, असा आदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन करण्यासाठी त्यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्या नियोजनाची धुरा श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्यावर सोपवली आहे..थोरात यांच्याकडून आता नागवडे यांना बळ दिले जात आहे.

दक्षिणेतील विखे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विखेंचा प्रचार सुरू केला आहे. परंतु पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शांत होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचा प्रचार करावा, यासाठी तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे रविवारी दुपारी नगरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

थोरात व विखे हे जरी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असले तरी त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष कधीही लपून राहिलेला नाही. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांचा पराभव करण्यासाठी बाळासाहेब थोरात सरसावले आहेत. त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विख यांची धाबे चांगलेच दणाणले आहेत.