भिडेंनी एखादा आंबा सरकारला द्यावा, किमान ‘विकास’ तरी जन्माला येईल: सुनील तटकरे

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिक येथील सभेमध्ये ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते’. आतापर्यंत १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा सुध्दा त्यांनी केला आहे. या विधानामुळे भिडे गुरुजीवर टीकांचा भडीमार होत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणीस आमदार सुनिल तटकरे यांनी भिडेंच्या विधानावर टिका केली आहे. ‘देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी यासारखे अनेक जटील प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. संभाजी भिडेंनी या सर्व समस्येतून देशाला बाहेर आणण्यासाठी त्यांच्याकडील एखादा तरी आंबा या सरकारला दयावा. जेणेकरून चार वर्षांनी का होईना विकास जन्माला येईल’, अशी जोरदार टीका केली आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत सर्वत्र देशाचे चित्र बदलले. विद्यमान सरकारने ६० वर्षे काँग्रेस आघाडीने कोणतेच काम केले नाही असा विरोधाभास जनतेत निर्माण केला. मात्र भाजप सरकार निवडणुकीपुर्वी जनतेला दिलेली आश्वासने पुर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. १५ लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील असे स्वप्नं या सरकारने सर्वसामान्यांना दाखवले.

पदवीधर झालेल्या युवकाला दरवर्षी २ कोटी रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला अाहे. आता हाच युवक येत्या निवडणुकीत परिवर्तन घडवून पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात हातभार लावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान सभेदरम्यान आमदार सुनिल तटकरे यांनी भिडेंच्या आंबा प्रकरणावर जोरदार प्रतिक्रीया दिली आहे.