इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी, खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या…

श्रीरामपूर : पोलिसनामा ऑनलाइन – कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीबाबत वादग्रस्त विधान केले असताना त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्यावर टीका केली असून श्रीरामपूर नगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकरांच्या वक्तव्यावर खंत व्यक्त करत त्यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ‘पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशाप्रकराची अंधश्रद्धा पसरवली जाणं हे दुर्दैवी आहे. किर्तनकारांबद्दल माझ्या मनात मान सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे. पण अंधश्रद्धा नाही. यशवंतराव चव्हाणांच्या, दाभोळकरांच्या संस्कारात आम्ही वाढलो आहोत. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे दुर्दैवी आहे,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच राज्यात महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण वाढत असून तो सामाजिक प्रश्न आहे. त्यासाठी फक्त कडक कायदे करून प्रश्न सुटणार नाहीत तर समाज प्रबोधन करण्याचीही गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. घरगुती अत्याचाराच्या घटना घडत असून त्यांचाही विचार करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

श्रीरामपूर येथे नगरपालिकेतर्फे बीजमाता राहीबाई पोपेरे, हिवरे बाजार पॅटर्नचे जनक पोपटराव पवार, क्रिकेटपटू झहीर खान यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यात झहीरच्या वतीने त्यांच्या आई झकीया खान व वडील बख्तियार खान यांनी सत्कार स्वीकारला. दरम्यान कार्यक्रमाला तेथील नगराध्यक्षा सौ. अनुराधा आदिक, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांच्यासह पदाधिकारी, तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.