पोलीस भरती नियमावलीतील बदलासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार – सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन भरती सुरु होण्याच्या तोंडावर पोलीस भरती प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतलेल्या तयारी करणारे उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत. भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारांच्या भावना मांडणार आहे. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सारसबाग येथील कै. बाबूराव सणस मैदानावर तयारी करणाऱ्या उमेदवारांची त्यांनीं मंगळवारी भेट घेतली.

दोन दिवसांपुर्वी गृहखात्याने पोलीस भरती प्रक्रियेत बदल करत शारिरिक चाचणीला ५० आणि बौद्धिक चाचणीला १०० गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पोलीस भरतीसाठी दररोज सणस मैदानावर तयारी करणाऱ्या युवक-युवतींची भेट घेऊन खा. सुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांचा भावना जाणून घेतल्या.

यावेळी त्या म्हणाल्या, तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या काळात मोठयाप्रमाणावर भरती झाली होती. त्यावेळी भरती प्रक्रियेत कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. सरकार असंवदेनशील आहे. गेल्या वर्षी शारिरिक चाचणीत कमी पडल्याने भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले होते. गेले वर्षभर अनेक युवक युवती पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. मात्र भरती प्रक्रियेच्या तोंडावर बदल करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आत्महत्या करायची का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

पोलीस भरती प्रक्रिया बदलण्यास काही हरकत नाही. मात्र, ऐनवेळी केलेल्या बदलांमुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारांच्या भावना त्यांच्यापुढे मांडणार आहे. पोलीस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच ठेवावी, अशी विनंती मी त्यांना करणार आहे. तर उमेदवारांनी नाउमेद न होता बौद्धिक चाचणी आणि मैदानी सरावावर लक्ष केंद्रीत करावे. भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या भावना समाजमाध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन सुळे यांनी यावेळी केले.