गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींच्या विजयाचं अनोखं ‘सेलिब्रेशन’

अहमदाबाद : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं. यानंतर मोदींच कौतुक देशभरातून होतं आहे. त्याच कौतुकाचा भाग म्हणून सुरतमधल्या एका आईसक्रिम वाल्याने अनोखी शक्कल शोधली आहे. या आईसक्रिम वाल्यानं मोदींचा चेहरा असलेले आईसक्रिम तयार केले आहे. हे आईसक्रिम सध्या चांगलेच चर्चेत आहे. ‘मोदी सीताफळ कुल्फी’ या नावाने हे आईसक्रिम मिळत आहे. विवेक अजमेरा या आईसक्रिम पार्लर मालकाने भाजपाच्या विजयाचं अनोखं सेलिब्रेशन केलेलं पहायला मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा आकार असलेलं हे आईसक्रिम सध्या गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आईसक्रिमवर असलेली प्रतिमा ही कोणत्याही मशीनद्वारे किंवा संगणकाद्वारे न बनवता हाताने तयार करण्यात आली आहे. या आईसक्रिमसारखी २०० आईसक्रिम तयार करण्यासाठी आईसक्रिम पार्लरमध्ये काम करणाऱ्यांना २४ तासांचा अवधी लागला असे एएनआयने म्हटले आहे. हे खास आईसक्रिम ३० मे पर्यंत मिळू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हापासून हे आईसक्रिम मिळणं बंद होणार आहे. विजयाच्या दिवसापासून मोदी सीताफळ कुल्फी शहरात चांगली विकली जाते आहे. या कुल्फीला चांगला प्रतिसाद गुजरात भागातून मिळतो आहे असंही अजमेरा यांनी म्हटलं आहे.