सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : ‘तो’ निर्णय घ्यायला राज्य सरकारला अडचण काय ?, भाजपचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाकडे सोपवावा अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारकडे केली आहे. इतकंच नाही तर सुशांतच्या कुटुंबीयांना जर महाराष्ट्र पोलिसांकडून तपास नको असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात सरकारला काय अडचण आहे असा सवालही राम कदम यांनी केला.

सुशांतच्या अचानक जाण्यान इंडस्ट्रीतील काही लोक आता असा आरोप करत आहेत की, सुशांतला आत्महत्या करायला भाग पाडलं आहे. इंडस्ट्रीतील राजकारण आणि गटबाजीला तो बळी पडला आहे त्याचा हा खून आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर आणखीही बरंच काही बोललं जात आहे जे थांबण्याचं नाव घेत नाहीये.

सुशांतच्या कुटुंबीयांनीच महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही असं वक्तव्य केलं होतं. हाच धागा पकडून आता राम कदम यांनी सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. राम कदम म्हणाले, “सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता अनेक नावं पुढं येत आहेत. देशभर चर्चाही सुरू आहे. अनेक शहरांशी या प्रकरणाचा संबंध असू शकतो. महाराष्ट्र पोलीस आणि महाविकास आघाडीवर आमचा विश्वास नाही असं जर त्याचे कुटुंबीय म्हणत असतील तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायला काय हरकत आहे. महाराष्ट्र सरकारनं याबाबत निर्णय घ्यायला हवा असंही राम कदम म्हणाले आहेत.