लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

इगतपुरी : पोलीसनामा ऑनलाईन – ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लैंगिकत अत्याचाराच्या प्रकरणातील संशयित आरोपीला धावत्या रेल्वेमधून इगतपुरी आरपीएफच्या पोलिसांनी अटक केली आहे. संशयित उत्तरप्रदेशात पळून जात असताना त्याला अटक करण्यात आली. संशयित तरुणाला औशिवरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुफरान रईस खान (वय – २५) हा लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी गुरुवारी (दि.२१) गोरखपूर, उत्तप्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वेने पलायन करणार असल्याची गुप्त माहिती इगतपुरी रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार, त्याला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी डी. एम.पालवे, विशाल पाटील, तुकाराम आंधळे, विजय भाबड, विनोद साळवे यांनी गोरखपूरकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची इगतपुरी रेल्वे स्थानकावर सकाळपासून तपासणी सुरू केली.

दरम्यान, गुरूवारी गोरखपूर एक्सप्रेस ही इगतपुरी रेल्वे स्थानकावर आली असता सर्वसाधारण डब्याची तपासणी करताना संशयित गुफरान आढळून आला. त्याला रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय बर्वे यांनी दिली आहे.