लाठीचार्ज प्रकरणातील ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. या संतापजनक प्रकारानंतर पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर टिकेची झोड उडली. आज विधीमंडळामध्ये पुण्यात झालेल्या लाठीचार्जचे पडसाद उमटले. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्णबधीरांवर लाठीचार्ज केला त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.

कर्णबधीरांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. निलंबन केल्यानंतर त्यांची चौकशी करा. तसेच या अमानुष लाठीचार्ज प्रकरणात सरकारकडे थोडी जर नैतिकता शिल्लक असेल तर सरकारने तात्काळ जाहीर माफी मागावी. खरे तर मंत्र्यांनी नैतिकता स्विकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

मूकबधीर आंदोलकांवर परवानगी न घेता मोर्चा काढल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, त्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या टीकेनंतर पुणे पोलीस बॅकफूटवर गेले आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल न करण्याचे आदेश दिले.

सोमवारी समाज कल्याण आयुक्तालय येथे मुकबधीर विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासांठी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची सांकेतिक भाषा समजली नाही. त्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यातल्या समन्वयाच्या अभावामुळे चेंगराचेंगरी झाली असल्याचे मत पोलिसांचे आहे.

बंदोबस्तासाठी असललेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे नियमाप्रमाणे आवश्यक असलेली लाठी असल्याने काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करताना या ठिकाणी लाठीचा वापर केला आहे.  हे प्रकरण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरुवातीपासूनच संवेदनशीलपणे हाताळले असल्याचे मत पुणे पोलिसांचे आहे.

पोलिसांच्या या म्हणण्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधीमंडळात आता पोलिसांना कर्णबधीरांची भाषा शिकण्यासाठी प्रक्षिण देणार का असा सवाल उपस्थित केला. काल लाठीचार्ज झाल्यानंतर पुणे पोलीस दलातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने लाठीचार्ज झाला नसल्याचे प्रसारमाध्यांना सांगितले होते. पोलिसांनी आज यु-टर्न घेत लाठीचार्ज झाल्याचे मान्य करीत पोलिस कर्मचाऱ्यांची बेशरम पणाने बाजू घेतली आहे. या प्ररकरणात राज्य सरकार कोणती भूमीका मांडणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्यास कर्णबधीरांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असे म्हणावे लागेल.

https://twitter.com/RVikhePatil/status/1100378354887413760