सारसबाग खाऊ गल्लीतील सात व्यावसायिकांचे परवाने निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- सारसबाग येथील खाऊ गल्लीला क्लीन स्ट्रीट फुड हबचा दर्जा मिळण्यासाठी विविध त्रुटी दूर न करता सहकार्य न करणाऱ्या सात व्यावसायिकांचे परवाने अन्न व औषधे प्रशासनाने निलंबित केले आहेत. तर इतर व्यासायिकांना तपासण्या करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सं. पा. शिंदे यांनी दिली आहे.

रामप्रसाद ज्यूस पावभाजी, आम्रपाली ज्यूस पावभाजी, आम्रपाली ज्यूसबार, आम्रपाली स्नॅक्स सेंटर, शिवांजली (रविंद्र चव्हाण), शिवांजली (बापू चव्हाण), शिवांजली (हिरामन चव्हाण) या सात व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

स्वच्छ व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सारसबागेतील खाऊ गल्लीला राज्य सरकारने ‘क्लीन स्ट्रीट फुड हब’ चा विशेष दर्जा देण्याचे जाहिर केले होते. याबाबत येथील सर्व व्यावसायिकांची १५ जून २०१८ रोजी प्रशासनाने बैठक घेतली होती. त्यांना यासंदर्भात संपुर्ण माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले. तसेच अन्न व औषध प्रशास, महानगरपालिका, FSSAI यांच्या संयुक्त विद्यमाने खाऊ गल्लीतील सर्व व्यावसायिकांची पुन्हा २५ ऑगस्ट २०१८ रोजी तपासणी करण्यात आली. त्यावेळी तेथे डस्टबीन उघडे असणे, कामगारांना अप्रन, हेडकॅप नसणे, वर्कींग सरफेस( भाज्या चिरण्यासाठी) फुड ग्रेड नाही, पाण्याच्या टाकीची स्वच्छता नाही, कामगारांची स्वच्छता नाही, ट्युबला कव्हर नाही अशा त्रुटी दिसून आल्या. त्यावर उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. त्यासोबतच तेथील ड्रेनेज वारंवार तुंबणे, घौड्यांच्या लीदमुळे घाण निर्माण होणे, प्रदुषण, कचरा या महापालिकेअंतर्गत येणाऱ्या स्वच्छतेच्या बाबींबद्दल महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला.

त्यानतंर तेथे FSSAI कडून स्वच्छतेबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर १५ जानेवारी रोजी तेथे पुन्हा तपासणी केली. त्यावेळी काही व्यावसायिकांनी तेथे प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे सात जणांचे परवाने १ महिन्यांसाठी रद्द करण्यात आले आहेत.

राज्यात क्लीन स्ट्रीट फुड हब योजनेअंतर्गत मुंबईतील गिरगाव चौपाटी, नागपूर येथील फुटाळा लेक चौपाटी या स्ट्रीट फुड ठिकाणांना क्लीन स्ट्री फुडचा दर्जा मिळाला आहे. परंतु सारसबाग येथील व्यावसायिकांच्या असहकार्यामुळे तो दर्जा मिळू शकला नाही असे अन्न औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.