आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्याचे संकेत

ADV

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – खा. राजू शेट्टी,  यांना उमेदवारी देण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे दिले. कोल्हापूरची जागाही राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे सांगत काँग्रेसने केलेली दावेदारी त्यांनी खोडून काढली.

एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेले खासदार पवार यांनी सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उद्योजक व्ही. बी. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजू लाटकर, आदिल फरास आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीत आघाडी होत आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४१ जागांचा निर्णय झाला आहे. सात जागांचा निर्णय बाकी असून तो होण्यातही काही अडचण नाही.’’ या जागावाटपात हातकणंगलेचा समावेश आहे का आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा मिळणार का, या प्रश्‍नावर श्री. पवार म्हणाले, ‘‘आघाडीत येण्यासाठी संघटनेशी चर्चा सुरू आहे. त्यांनी येण्याची तयारी दर्शवली तर हातकणंगलेची जागा सोडण्याबाबत विचार होऊ शकतो.’’ या मतदारसंघात इकडे-तिकडे सरकण्यास वाव असल्याचे सांगत खासदार शेट्‌टींच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला.

लोकसभेच्या कोल्हापूर जागेबाबत त्यांनी ही जागा देखील राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे सांगत काँग्रेसने मतदारसंघावर केलेला दावा फेटाळून लावला. खासदार धनंजय महाडिक यांना पक्षातूनच विरोध होत आहे, काही कार्यकर्त्यांनी महाडिक यांच्या विरोधात तक्रारी केल्याचेही श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर ते म्हणाले, ‘कार्यकर्त्यांनी मत व्यक्‍त केले पाहिजे. त्यांना तो अधिकार आहे. त्यांच्या भावना जाणून घेणे आवश्‍यक असते. मुंबई येथील बैठकीत यावर चर्चा झाली; मात्र इकडे आले की वेगळीच चर्चा असते,’’ असा टोलाही त्यांनी लगावला. कोल्हापूरच्या जागेवर कोण काय म्हणाले, मतभेद आहेत, अशी चर्चा फक्‍त कोल्हापुरातच ऐकायला मिळते. मुंबई, दिल्लीत ही चर्चा ऐकायला मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या मागणीतील हवा काढली 
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत आमदार सतेज पाटील यांनी लोकसभेच्या कोल्हापूर जागेवर दावा सांगितला होता. काँग्रेसच्या मुंबई येथील बैठकीत यावर चर्चा झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी या जागेवरून लढण्याची तयारीही दर्शवली; मात्र श्री. पवार यांनी, हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे सांगत काँग्रेसच्या मागणीतील हवाच काढून घेतल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होती.