‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यास स्वच्छता राखणेे आवश्यक : डॉ. अश्विनी घाटगे

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन ( मोहंम्मदगौस आतार) – कोरोना या विषाणू रोगाला नागरिकांनी घाबरून न जाता प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे मत नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी घाटगे यांनी

मार्गदर्शन करताना व्यक्त केले
नीरा (ता.पुरंदर ) येथे नीरा ग्रामपंचायत व नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना व जनजागृती करण्यासाठी नीरा ग्रामपंचायतीमध्ये शनिवारी (दि.१४) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मार्गदर्शन करताना डॉ.अश्विनी घाटगे बोलत होत्या.

डॉ. घाटगे म्हणाल्या कि, श्वसनाद्वारे कोरोनाचा विषाणू शरीरात जाऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना नाक, तोंड, चेहरा या अवयवांना हात लावू नये.तसेच नागरिकांनी प्रवास करताना गर्दीचे ठिकाण टाळावेत, आपल्या आजुबाजुमध्ये कोणीही व्यक्ती परदेशातून आल्यास त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्यासाठी सूचना करावी असे आवाहन केले.

यावेळी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पवार, स्थानिक डॉक्टर लिलाधर मंदकनल्ली, डॉ. निरंजन शहा, डॉ. राम रणनवरे, यांनी यावेळी कोरोना या रोगाविषयी मार्गदर्शन केले. तसेच म.गांधी विद्यालयाचे प्राचार्य गोरख थिटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना या रोगाविषयी मार्गदर्शन करावे अशी सूचना मांडली. सरकारी कर्मचाऱ्यांनी गावातच रहावे जेणे करून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येईल अशा सूचना यावेळी नागरिकांनी मांडल्या.

यावेळी सरपंच दिव्या पवार, उपसरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजेश काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण,ग्रामसेवक मनोज डेरे, म.गांधी विद्यालयाचे प्राचार्य गोरख थिटे, कन्या शाळेचे पर्यवेक्षक उत्तम काळे, राजकुमार शहा, नरेंद्र जैन, सतीश गालिंदे, हरिभाऊ जेधे, सुदाम बंडगर, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांच्यासह जि.प.शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

दरम्यान , नीरा गावात शनिवारी ( दि.१४) पासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व्हे करण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे नागरिकांनी आशा स्वयंसेविकांंना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य सहाय्यक गणेश जाधव यांनी केले.

जी व्यक्ती विदेशातून आली आहे, जी व्यक्ती कोरोनाग्रस्त रुग्ण, संशयित रुग्ण व त्यांच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे डॉ. लिलाधर मंदकनल्ली यांंनी सांगितले. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन स्वच्छता राखली तर कोरोना सारखा संसर्गजन्य रोग होऊ शकणार नाही असे डॉ. निरंजन शहा म्हणाले.

नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार म्हणाले की, कोरोना बाबत नागरिकांमध्ये गैरसमज जास्त आहे. हा आजार श्वसनाद्वारे होत आहे. सर्दी, खोकला , ताप हे कोणाला असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. प्रास्ताविक अनिल चव्हाण यांनी केले तर आभार बाळासाहेब भोसले यांनी मानले.