माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना अटक केलेल्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचे निधन

चेन्नई : वृत्तसंस्था – भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करणारे तामिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक व्ही. आर. लक्ष्मीनारायण यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. काल रविवारी २४ जून रोजी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून व्ही. आर. लक्ष्मीनारायण आजारी होते.

लक्ष्मीनारायण १९५१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते व्हीआरएल नावाने प्रसिद्ध होते. लक्ष्मीनारायण यांनी १९४५ मध्ये मद्रास ख्रिश्चियन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या पोलीस कारकिर्दिची सुरुवात केली होती. त्यांनी सीबीआयचे संयुक्त संचालक म्हणूनही काम पाहिलं होतं.

देशात आणीबाणी झाल्यानंतर इंदिरा गांधींची लक्ष्मीनारायण यांना सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्त करण्याची इच्छा होती. मात्र तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांना ते मान्य नसावं. म्हणून त्यांनी लक्ष्मीनारायण यांना पुन्हा तामिळनाडूमध्ये आणलं. त्यानंतर पोलीस महासंचालक बनवले.

लक्ष्मीनारायण यांनी भ्रष्टाचाराच्या एका आरोपाखाली इंदिरा गांधी यांना १९७७ मध्ये अटक केली होती. त्यामुळेही त्यांचे नाव अधिक चर्चेत आले होते. लक्ष्मीनारायण यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, चरण सिंह, मोरारजी देसाई यांच्यासह अनेक पंतप्रधानांच्या अंतर्गत काम केलं होतं. १९८५ साली ते तामिळनाडूचे पोलीस महासंचालक पदी असताना निवृत्त झाले.

दरम्यान, अनेक दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या २५ जूनला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

आरोग्य विषयक वृत्त –

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध

गोडपदार्थ खाताना ‘ही’ काळजी घ्या आणि दातदुखीच्या समस्या टाळा

सौंदर्य खुलवणारी ‘लिपस्टिक’ ठरतेय ‘जीवघेणी’

महाराष्ट्राभोवती कॅन्सरचा विळखा घट्ट ; रुग्णांची संख्या वाढली