Video : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य चंद्रमुखींवर भडकल्या उर्मिला मातोंडकर, म्हणाल्या – ‘…तोपर्यंत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही’

पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशात(UP) बदायूंमध्ये एका महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली. या घटनेने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या (Gang Rape) आठवणी ताज्या झाल्या आहेत. बदायूंमधील या बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती, उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आला. हादरवून सोडणारी बाब म्हणजे महिलेच्या गुप्तांगात जखमा आढळून आल्या असून, या अत्याचारात पीडित महिलेचा पायही मोडला. या घटनेत पीडितेचा मृत्यू झाला.

https://fb.watch/2V98A3a0bA/

या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत आपल्या सदस्य चंद्रमुखी देवी यांना पिडीत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. मात्र, यावेळी चंद्रमुखी देवी यांनी केलेल्या धक्कादायक विधानामुळे त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. यामध्येच आता उर्मिला मातोंडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“ही मानसिकताच मुळात आतमधून बदलण्याची गरज आहे. तोपर्यंत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला दोषी कसं म्हणू शकते. हे अत्यंत निराशाजनक आणि दुर्दैवी आहे”, असं ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. त्यांच्याप्रमाणेच अभिनेत्री तापसी पन्नू आणि पूजा भट्टनेदेखील नाराजी व्यक्त केली आहे. “जर देशात या मानसिकतेची लोकं नसते तर अशी घटना घडलीच नसती”, असं तापसी म्हणाली. तर,”तुम्ही पण यांच्या विधानाशी सहमत आहात का? ” असा प्रश्न पूजाने रेखा शर्मा यांना विचारला आहे.

दरम्यान, ३ जानेवारी रोजी महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मात्र, परत घरी आलीच नाही. महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मंदिरातील पुजारी व इतर दोघांनी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणून ठेवला. त्यांच्याकडे चौकशी करण्यापूर्वीच ते निघून गेले, असं कुटुंबीयांनी म्हटलं आहे.