‘कोरोना’ लस वितरण ठरवण्यासाठी टास्क फोर्सची उद्या महत्त्वाची बैठक

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना लस खरेदी, प्राधान्यक्रम आणि वितरण यासंबंधी निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली आहे. निती आयोगाचे डॉ. व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली या तज्ज्ञ समितीची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत. सर्व काही सुरळीत झाले तर सप्टेंबरपासून लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर आपल्याकडे लसीकरण कसे करायचे? त्याचा आराखडा निश्चित करण्यासंदर्भात उदया टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक होणार आहे. भारतात 22 लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत 44 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही समिती राज्य सरकार आणि लस उत्पादकांबरोबरही चर्चा करेल असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोनावरील लसीचा कार्यक्रम ठरवताना सर्व अंगांनी विचार करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची ही समिती स्थापना केली. यामध्ये संबंधित मंत्रालये, संस्थांचे प्रतिनिधी आहेत. लस निवडण्यापासून ते खरेदी आणि वितरणाची जबाबदारी टास्क फोर्सवर आहे.