Sangli News : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत अन् शिक्षक नेते डॉ. तुकाराम लाड यांचं 87 व्या वर्षी निधन

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि शिक्षक नेते डॉ. टी. डी. तथा तुकाराम धोंडीराम लाड (वय 87) यांचे गुरुवारी (दि. 4) सांगलीत निधन झाले. पंधरा दिवसापूर्वी छोट्या अपघातामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तेंव्हापासून ते झोपूनच होते. गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा प्रताप, सून, नातवंडे असा परिवार आहे.

लाड यांनी 1972 मध्ये सांगलीतील काही सहकार्यांसमवेत विश्रामबाग शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. सध्या या संस्थेअंतर्गत बालक मंदिर, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा चालविले जात असून सुमारे 1700 विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या काही वर्षांपर्यंत संस्थेत अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. एमएबीएड शिक्षणानंतर काही काळ कवठेपिरानला हिंदकेसरी विद्यालयात व सांगलीत देशभक्त नाथाजी लाड विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम केले.

विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांवर त्यांनी शासनाबरोबर प्रदीर्घ संघर्ष केला. 1985 मध्ये मंत्रालयावर मोर्चाही काढला होता. 1996 मध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणुक लढविली होती.क्रांतीसिंह नाना पाटील हे त्यांचे मामा होते. शिक्षणाविषयी अतीव प्रेम असणा-या टीडी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी बीएस्सी ॲग्रीची पदवी मिळविली होती.