‘७ वी’च्या विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप

अमरवती : पोलीसनामा आॅनलाइन – जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी या शिक्षकाला बेदम चोप दिला. येवदा पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून शिक्षकाची सुटका करीत त्याला अटक केली. दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील शाळेत ही घटना घडली.
संजय उत्तमराव पवार (५०) असे अटक करण्यात आलेल्या नराधम शिक्षकाचे नाव आहे. वडनेर गंगाई येथील जिल्हा परिषद शाळेत रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी इयत्ता सातव्या वर्गात शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीलाही रुबेला लस देण्यात आली. लस दिल्यानंतर नराधम शिक्षक संजय पवार याने सदर विद्यार्थिनीला जवळ घेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यामुळे घाबरलेली विद्यार्थिनी तेथून निघून गेली. रडत रडत घरी जाऊन तिने हा प्रकार आईला सांगितला. या घटनेमुळे पीडितेच्या आईसह गावकरीही चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी नराधम शिक्षक संजय पवार याला चांगलाच चोप दिला.

घटनेची माहिती येवदा पोलिसांना मिळताच ठाणेदार नितीन चरडे आपल्या ताफ्यासह वडनेर गंगाईत दाखल झाले. त्यांनी शिक्षक संजय पवार याची संतप्त जमावाच्या तावडीतून सुटका करून त्याला अटक केली. संजय पवार याने यापूर्वीही असे कृत्य केल्याची माहिती यावेळी समोर आली. घटनेनंतर गावकऱ्यांनी संजय पवार याला निलंबित करण्याची मागणी केली. या प्रकरणी येवदा पोलिसांनी आरोपी संजय पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.