‘शिक्षक’ व ‘पदवीधर’चा निवडणूक कार्यक्रम जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नाशिक विभाग शिक्षक, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या विधानपरिषदेच्या चार जागांचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केला. या मतदारसंघांत ८ जून रोजी मतदान होत असून १२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे यांनी दिली आहे.

सध्याच्या आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत आहे. यात शिवसेनेचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत (मुंबई पदवीधर), राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन तटकरे (कोकण पदवीधर), लोकभारतीचे कपिल पाटील (मुंबई शिक्षक)आणि नाशिकचे अपक्ष सदस्य प्रा. डॉ. अपूर्व हिरे (नाशिक विभाग शिक्षक) यांचा समावेश आहे. सध्याच्या आमदाराच्या सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे पुन्हा मतदान घेण्याचे निशचित केले आहे.

या चारही जागांसाठी २२ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. २५ मे रोजी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शुक्रवारी, ८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान आहे. बुधवारी, १२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघातील डॉ. अपूर्व हिरे यावेळी विधानपरिषदेसाठी इच्छुक नाहीत. तर कपिल पाटील, निरंजन डावखरे या विद्यमान सदस्यांची त्याच मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानले जात आहे. शिक्षक मतदारसंघात आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शिक्षक परिषद या संघटनेच्या उमेदवाराला भाजपा पाठिंबा मिळत असे. यावेळी मात्र नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपने परिषदेला न विचारता आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिक्षक परिषदही स्वत:चे उदेवार देण्याच्या तयारी आहे. यामुळे भाजपेतर उमेदवारांना याचा फायदा मिळतो की आयत्या वेळी शिक्षक परिषद व भाजप यांच्यात समेट होतो यावर बरेच काही अवलंबून असेल.

मुंबईतील शाळा १५ जूनपासून सुरू होत असून मुंबईतील अनेक शिक्षक आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ८ जून रोजी घोषित केली आहे. त्यामुळे ही निवडणूक शाळा सुरू झाल्यावर घेण्यात यावी, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर, ८ जूनला शिक्षक मुंबईत परतणार नाहीत. यामुळे त्या दिवशी निवडणूक घेतल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होईल, असे मत मुंबईत मुख्याध्यापक संघटनेने व्यक्त केले आहे.