Coronavirus चा ‘इम्पॅक्ट’ Google वर, रद्द केला I/O 2020 ‘इव्हेन्ट’

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे केवळ चीन आणि इटलीच नव्हे तर जगातील 70 देश त्रस्त आहेत. जगभरात या महामारीचा प्रकोप पसरत असल्याने प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे. कोरोनाच्या धोक्यापासून भारतही अलिप्त राहिलेला नाही. भारतातही याचा संसर्ग पसरल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण इव्हेन्ट रद्द करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे गुगल आय/ओ 2020 सुद्धा रद्द केल्याचे वृत्त आले आहे.

गुगलने आपली अधिकृत वेबसाईटवर गुगल आय/ओ 2020 इव्हेन्ट रद्द केल्याची माहिती देताना स्पष्ट केले की, कोरोना व्हायरसमुळे हा इव्हेन्ट रद्द करण्यात आला आहे. कारण यामध्ये हजारो लोक सहभागी होणार आहेत आणि कोरोनाच्या संसर्गापासून लोकांना वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनीने माहिती दिली की, ज्या लोकांनी इव्हेन्टसाठी तिकिटे खेरदी केली आहेत, त्यांना 13 मेपर्यंत तिकाटाचे पैसे रिफंड केले जातील. हा इव्हेंट 12 ते 14 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला होता. याच्या नव्या तारखेची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. गुगलचे म्हणणे आहे की, आमच्यासाठी आरोग्य आणि सुरक्षा सर्वात महत्वपूर्ण आहे.

गुगलने काही दिवसांपूर्वीच गुगल क्लाउड इव्हेन्टसुद्धा रद्द केला होता. तसेच यापूर्वी फेब्रुवारीत होणारा एमडब्ल्यूसी 2020 सुद्धा रद्द केला होता. याशिवाय फेसबुकने डेव्हलपर्स कॉन्फरन्स एफ8 2020 सुद्धा कोरोनाच्या कारणामुळे रद्द केला. तसेच टेक जगतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी कोरोनाच्या कारणामुळे आपले इव्हेन्ट रद्द करून हे इव्हेन्ट ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याचा सल्ला दिला आहे.