अंबरनाथ : …म्हणून थेट तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी, व्हिडिओही व्हायरल झाल्याने खळबळ

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेल्या मतदार याद्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याचा आरोप सर्वपक्षीयांनी केला आहे. यादीतील गोंधळाला नेमके कोण जबाबदार याचा शोध घेतला जात असतानाच रिपाईचे माजी शहराध्यक्ष अजय जाधव यांनी थेट या मतदार यादीतील गोंधळाला तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना जबाबदार धरत त्यांना यादीतील गोंधळ न सोडवल्यास थेट गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात जाधव यांनी संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. त्यांच्या या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

विधानसभेच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांचा समावेश केल्याने त्याचा देखील त्रास राजकीय पक्षांना होत आहे. बोगस नावे पालिका निवडणुकीत काढणे शक्य नसल्याने त्याच आधारावर निवडणुका घेतल्या जाणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप करीत बोगस मतदार संदर्भात आपला आक्षेप नोंदवत आहेत. एवढेच नव्हे तर मतदार यादी तयार करताना एका प्रभागातील नावे थेट दुसरा प्रभागात टाकून संबंधित कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. पालिकेची यादी तयार करताना कर्मचाऱ्यांचा चुकीचा भूर्दंड हा थेट निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बसणार आहे. दरम्यान तहसीलदार जयराज देशमुख म्हणाले, अजय जाधव यांच्या व्हिडिओ वरून त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली असून पुढील कारवाई पोलीस प्रशासनामार्फत केली जाणार आहे.