Coronavirus Impact : ….तर जगभरातील 3 कोटी 40 लाख नोकर्‍या धोक्यात, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रकोप अजूनही जगभरात सुरू आहे. जगभरात कोरोना रूग्णांची एकुण संख्या आता 1 कोटींच्या पर्यंत पोहचली आहे. तसेच मृतांचा आकडाही सतत वाढत चालला आहे. कोरोनाचा या प्रकोपावर नियंत्रण आणण्यासाठी जगातील बहुतांश देशांनी लॉकडाऊन लागू केला. अजूनही अनेक देश लॉकडाऊनमध्ये आहेत तर काही अनलॉकच्या स्थितीत आहे. मात्र, या लॉकडाऊनचा परिणाम होऊन अनेक देशांच्या अर्थव्यवस्था खिळखिळ्या झाल्या आहेत. विविध सेक्टरवर याचा परिणाम झाल्याने लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्यात तर काहींच्या नोकर्‍या धोक्यात आहेत. यासंदभात जागतिक कामगार संघटनेने (आयएलओ) बेरोजगारीबाबत एक अंदाज वर्तवला असून यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाचा कहर असाच राहिल्यास मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करावा लागेल.

सध्या कोरोनामुळे अमेरिका, इटली, स्पेन आणि भारतासारखे देश मोठ्याप्रमाणात ग्रासले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या या देशांमध्ये वाढत असून मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. जगात आतापर्यंत एकुण 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे बेरोजगारीत प्रचंड वाढ होत आहे. 2020 वर्षाच्या दुसर्‍या टप्प्यात म्हणजे जुलै ते डिसेंबरदरम्यान कोरोना व्हायरसचा आणखी प्रादुर्भाव दिसून आला किंवा वाढला तर कामगारांना मोठा फटका सहन करावा लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने वर्तवलेले भाकित खुपच धक्कादायक असे आहे. यामध्ये म्हटलीे आहे की, कोरोनाची दुसरी लाट आल्यास जगभरातील कामाच्या तासांमध्ये 11.9 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. तर, तब्बल 3 कोटी 40 लाख पूर्णवेळ कामगार बेरोजगार होतील. कोरोनामुळे जगभरात कामाचे झालेले नुकसान, कामगारांच्या गेलेल्या नोकर्‍यांमुळे आगामी काळातही अनिश्चितता आणि परिपूर्ण काम होणार नसल्याचे दिसत आहे. 2020 च्या दुसर्‍या तिमाहीत कामाच्या तासांमध्ये 14 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे, साधारण 4 कोटी कामगारांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत, असे संघटनेने केलेल्या सर्वेक्षणाच्या 5 व्या आवृत्तीत म्हटले आहे.

गेल्या 2 तिमाहीतील नुकसान भरुन येणे सहज शक्य नसून कोरोनाची आणखी लाट आल्यास जास्त प्रमाणात नोकर्‍या जातील, असे आंतरराष्टीय कामगार संघटनेचे संचालक जनरल गे रिडर यांनी म्हटले आहे. त्यांनी चालू वर्षाच्या दुसर्‍या टप्प्यातील धोक्याबाबत भाकित केले आहे.