दहशतवादी हल्ल्याचे प्रशिक्षण घेवुन परतणार्‍यास एटीएसकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन

राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने पाकिस्तानातुन दहशतवादी हल्ल्याचे प्रशिक्षण घेवुन मुंबई आलेल्या एकाला अटक केली असून त्याला दि. 21 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

एटीएसने 32 वर्षीय व्यक्‍तीस अटक केली आहे. मुंबईतील एकजण पाकिस्तान येथुन दहशतवादी संघटनेच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेवुन नुकताच मुंबईत परत आल्याबाबतची गोपनिय माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटला मिळाली होती. एटीएसने त्याची शोधाशोध सुरू केली आणि त्याच्या दि. 11 मे रोजी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे सखोल तपास केला असता अटक आरोपीला बॉम्बस्फोट विषयक गुन्हयातील एका वॉन्टेड आरोपीने मुंबई येथून शारजाह येथे बोलावुन घेतले होते. काही दिवस शारजाह येथे राहिल्यानंतर त्याला दुबईमार्गे पाकिस्तानमध्ये कराची येथे पाठविण्यात आले.

पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 32 वर्षीय व्यक्‍तीस शस्त्र चालविणे, बॉम्ब तयार करणे, आत्मघाती हल्‍ले करणे, आगी लावणे याच्यासह इतर घातक कृत्यांचे प्रात्यक्षिक तसेच प्रशिक्षण देण्यात आले. अटक आरोपी हा वॉन्टेड आरोपीशी संगणमत करून कट रचुन अतिमहत्वाच्या व्यक्‍ती, वर्दळीची ठिकाणे व अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या आस्थापना यांच्यावर दहशतवादी हल्‍ला करण्यासाठी योजना आखत होता अशी माहिती एटीएसच्या आत्‍तापर्यंतच्या तपासामध्ये समोर आली आहे. एटीएसने अटक आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. 21 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.