Lockdown : ‘लॉकडाऊन’च्या नुकसानामध्ये आपला फायदा पाहतायेत ‘दहशतवादी’ आणि ‘नक्षलवादी’, बेरोजगार युवक ‘टार्गेट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दहशतवादी संघटना व नक्षलवाद्यांनीही अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाचा फायदा उठविण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांपासून ते दहशतवादी संघटनांपर्यंत त्यांनी यासाठी त्यांचे स्लीपर सेल्स सक्रिय करण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाऊननंतर ते बेरोजगार तरुणांची भरती करण्यात सक्षम होतील, असा विश्वास या संघटनांचा आहे. या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तैयबा काश्मीरमधील आपली मुळे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

इतर राज्यात वाढल्या हालचाली ….. नक्षलवादीही सक्रीय
उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या नक्षलवाद्यांच्या सक्रियतेचा आढावा घेण्यात येत आहे. छत्तीसगड, झारखंड, ओरिसा यासारख्या राज्यात नक्षलवाद्यांनी नवीन भरतीसाठी खेड्यांमध्ये संपर्क वाढविला आहे. सीआरपीएफ या सर्व घडामोडींकडे बारकाईने पहात आहे. सुरक्षा दलांचे डीआयजी इंटेलिजेंस एम. दिनाकरन सांगितले कि, सुरक्षा दलांनी तिथे घट्ट पकड केली आहे. सतत कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे आता मोडले आहे. दरम्यान, नवीन परिस्थितीत ते नवीन भरती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे गेली दोन वर्षे नक्षल क्षेत्रात नवीन नक्षलवादी भरती जवळपास रखडली होती.

काश्मीरमध्येही केले जातायेत प्रयत्न
कलम 370 रद्द झाल्यानंतर गेल्या वर्षी काश्मीरमध्ये जो लॉकडाउन झाला होता, त्यामुळे दहशतवाद्यांची भरती प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. जम्मू-काश्मीरचे पोलिस डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, दहशतवादी आता नवीन सदस्यांची भरती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन-तीन वर्षांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध अनेक मोठी कारवाई केली. स्थानिक पातळीवरील दहशतवाद्यांनी अनेक तरुणांची दिशाभूल केली आणि त्यांना त्यांच्या संघटनेत समाविष्ट केले. सुरक्षा दलाने 160 अतिरेकी ठार मारले तेव्हा त्यांनी स्थानिक पातळीवर नवीन भरती करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली. सुमारे 140 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले. यातील बरेच तरुण परत आले, बरेच ठार झाले. त्यांनतर आता हे दहशतवादी कोरोनाच्या लॉकडाऊनचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.