‘ठाकरे’ सिनेमा सेन्सॉर च्या कात्रीत, …तरीही ट्रेलर होणार लॉन्च : शिवसेनेची भूमिका 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बहुप्रतिक्षीत, बहुचर्चित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘ठाकरे’ सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच या चित्रपटातील काही दृश्य आणि संवादावर सेन्सॉर ने आक्षेप घेतला आहे.
 … तरी वेळेतच ट्रेलर होणार लॉन्च : शिवसेनेची भूमिका 
ठाकरे सिनेमातील तीन दृश्य आणि काही संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतर चित्रपटाचा ट्रेलर ठरल्याप्रमाणे वेळेतच लॉन्च होणार असल्याची रोखठोक भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड आणि शिवसेना समोरासमोर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.शिवसेना आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यात या मुद्द्यांवरुन चर्चा सुरु आहे. मात्र शिवसेनेचा आक्रमक पवित्रा पाहता सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपांना शिवसेना जुमानणार का? आणि सिनेमातील दृश्यांवर कात्री लागणार का?  हे पाहावं लागणार आहे.
नक्की का घेतला आहे आक्षेप
–शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची बोलण्याची पद्धत सडेतोड आणि रोखठोख होतीबाळासाहेब अनेकदा आपल्या भाषणात शिवराळ भाषेचा वापर करत असे.  चित्रपटात देखील त्याच प्रकारे सवास वापरण्यात आल्याने सेन्सॉरने आक्षेप घेतला आहे.
–बाबरी मशीद पतनाच्या पार्श्वभूमीवरचे काही संवाद चित्रपटात आहेत. देशात सध्या राम मंदिर उभारणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा वातावरणात हे संवाद चित्रपटातून जसेच्या तसे आल्यास वाद निर्माण होऊ शकतो, असं सेन्सॉर बोर्डाचं मत असल्याचं सूत्रांकडून समजते आहे.
उत्सुकता शिगेला 
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यानं ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटाचे पोस्टर आधीच प्रसिद्ध झाले असून सोशल मीडियात नवाजच्या लूकची जोरदार चर्चा आहे. नवाजनं बाळासाहेबांची व्यक्तिरेखा नेमकी कशी साकारली आहे, याबद्दल तमाम सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. आज चित्रपटाचा ट्रेलर येणार असल्यानं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असतानाच सेन्सॉरनं काही दृश्यांना हरकत घेतली आहे.
‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर आज, २६ डिसेंबर रोजी कार्निव्हल आयमॅक्स वडाळा येथे प्रदर्शित होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शानदार सोहळा रंगणार आहे.